देवीची माहिती

hqdefault

योगेश्वरी दर्शन

श्री योगेश्वरी ही अंबानगरीचे एक भूषण आहे. तसे पहिले तर  अंबानगरीने साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रीय मनाला अभिमान वाटावा अशी अनेक भूषणे धारण केली आहेत. मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत कवी दासोपंत यांचे समाधिस्थान ही त्यापैकी दोन उल्लेखनीय आहेत. अंबानगरीचे महत्व या कारणामुळे अतोनात वाढले असून प्राचीन काळी ही नागरी इतर नगरांना बुशन भूत ( नगर भूषण भवः ) होऊन बसली होती.योगेश्वरीचे शक्तिपीठ असल्यामुळे तर तिला पवित्र तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले होते व आजही ते कायमच आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून तिच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची सारखी रीघ लागलेली असते.येगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिचे दर्शनास येत असतात. महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठे आणि अनेक उपपिठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच एक शक्तिपीठ अस्तित्वात आहे. अंबाजोगाई शहराला जसे अंबेचे शक्तिपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे योगेश्वरी देवीला देखील इतर ठिकाणांच्या देवीपेक्षा एक खास वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे, देवीच्या भक्तीचे व्रत घेणारांना ( आराधी होणारांना ) परडी आणि पोत यांचा व्रतांचे प्रमुख चिन्ह म्हणून स्वीकार करावा लागतो. त्यातले त्यात परडी त्यांचा ट्रेंडमार्कच होऊन बसते. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत, त्यात तिने एका हातात पत्र (परडी) धारण केल्याचा उल्लेख रुद्र्यामलखंडातील देवीच्या स्तवनाचे श्लोकात दिला आहे.

इतर शक्तीपिठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध (पात्र) दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे. योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा.1

योगेश्वरी नाव कसे पडले –

योगिनी हृद्यदिपिकेत योगिनीचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. पार्वतीच्या शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रम्हा, विष्णु, महेश आणि देवता यांच्या मध्ये अंतर्भुत असलेल्या लहान मोठ्या पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधतात. योगीनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. या प्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे.

योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ –

योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ भारतात आदिशक्तीची उपासना सुरु झाली. तेव्हापासूनचा धरण्यास हरकत नाही. आता आदि शक्तीची उपासना केव्हापासून सुरु झाली ते पहावयाचे असेल तर आपणास ऋग्वेद कालाइतके मागे जावे लागेल. तरीपण इतिहास संशोधकांचा तर्क कठोर विचारसरणीप्रामाणे असे अनुमान करण्यात येते की, शैव वैष्णव शक्ती इत्यादी धर्मपंथातील उपाय देवतांचा समन्वय घडवून आणणारी पंचायतन पूजा राजघराण्याच्या उत्तर काळात सुरु झाली असावी. हे अनुमान मान्य केले तर सुमारे दीड हजार वर्षापूर्वी मुर्तिस्थापनेच्या काळापासूनच योगेश्वरी देवीची स्थापना झाली असावी. असे समजण्यास हरकत नाही.